भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

ब्रेकिंग : जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना महसूल सहायकासह खासगी वकील एसीबी च्या ताब्यात

जामनेर,मंडे टु मंडे न्युज. | दि. २१ सप्टेंबर २०२६ || जामनेर तहसील कार्यालयात शेतातील नवीन ये-जा रस्त्याच्या दाव्यात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महसूल सहायकासह एका खासगी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (२१ सप्टेंबर) करण्यात आली.

या प्रकरणातील तक्रारदार यांची जामनेर शिवारात गट क्रमांक ४०७ मध्ये शेती आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मिळावा, यासाठी त्यांनी सन २०२२ मध्ये जामनेर तहसील कार्यालयात वहिवाटीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावर तहसीलदारांकडे वेळोवेळी सुनावणी झाली असून, तो अंतिम निकालासाठी प्रलंबित होता.

तक्रारदार व त्यांच्या भावाने या प्रकरणाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रविण सुपडू गांगुर्डे (वय ४१) यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर तडजोड होऊन २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली.

पंचांसमक्ष मागणीची पडताळणी
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालय, जामनेर येथे पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी खासगी इसम वकील योगेश रामलाल वखरे (वय ४२, रा. स्वामी समर्थ नगर, जामनेर) यांनी महसूल सहायक गांगुर्डे यांच्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच गांगुर्डे यांनी स्वतःसाठी वखरे यांच्या माध्यमातून लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे विभागाने नमूद केले आहे.

२५ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई
सोमवारी तहसील कार्यालय, जामनेर येथे सापळा रचण्यात आला. गांगुर्डे यांच्या सांगण्यावरून योगेश वखरे यांनी पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम गांगुर्डे यांच्याकडे दिली असता त्यांनी ती स्वतः स्वीकारून पॅन्टच्या पुढील बाजूच्या उजव्या खिशात ठेवली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम जप्त केली.

या प्रकरणी आरोपी  क्र. १  प्रविण सुपडु गांगुर्डे, वय ४१ वर्षे, व्यवसाय नोकरी, महसुल सहायक, तहसिल कार्यलय जामनेर, जि. जळगांव, रा. प्लॉट नं.५५, अयोध्या नगर, गणेश पार्क जवळ जळगांव (विभाग- महसुल विभाग वर्ग-३),                   २. आरोपी क.२ योगेश रामलाल वखरे, वय ४२ वर्ष, व्यवसाय वकील (खाजगी इसम), रा.प्लॉट नं.३६, स्वामी समर्थ नगर, जामनेर जि. जळगांव. यांचेवर जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, ला.प्र.वि. नंदुरबार, कॅम्प जळगाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, ला.प्र.वि. जळगाव यांनी केले. सापळा पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि प्रदीप पोळ यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!