हतनूर धरणाचे १० दरवाजे १ मीटरने उघडले, जल साठ्यात झपाट्याने वाढ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढत असून गेल्या दोन दिवसांपूर्वी धरणाचे ८ दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले होते, परंतु आता पुन्हा पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रशासनाने आज ४१ दरवाज्यांपैकी १० दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हतनूर धरणाची पाणी पातळी २११.१२० मीटरवर पोहोचली आहे. एकूण साठा २४०.८० दलघमी असून, धरण सध्या ६२.०६ टक्के पाण्याने भरलेले आहे. संततधार पावसामुळे वाढलेल्या आवक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रशासनाने ५७० क्युमेक्स, अंदाजे २०१३० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता असून आणखी पुन्हा पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.


