चाळीसगावात १ हजार २१५ किलो गुळाचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
चाळीसगाव.मंडे टु मंडे न्युज || सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या फेस्टीवल २०२६ अंतर्गत चाळीसगाव शहरात शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात येवून सुमारे ८९ हजार ७१२ रूपये किमतीचा १ हजार २१५ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला. या गुळाला लेबल नसल्याचे आढळून आले असून संबंधीत अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले
आहेत, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन जळगाव विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी नुकतीच चाळीसगाव येथील घाट रोडवरील गुळाच्या व्यापाऱ्याकडे छापा टाकला असता गुळांच्या भेलीवर लेबल तसेच उत्पादन पॅकींग तारीख
नव्हती. तसेच गुळाच्या नैसर्गिक रंगाबाबत देखील सांशकता असून गुळाचे नमुने घेण्यात आले. ८९ हजार ७१२ रूपये किंमतीचा गुळ जप्त करण्यात आला असून फुड अॅक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जप्त गुळाचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.


