बांबू वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त : चालक पसार ; वनविभागाच्या कारवाईच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
यावल.मंडे टु मंडे न्युज | यावल वनविभागाच्या हरिपुरा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान संशयितरीत्या बांबू वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. वाहनामध्ये तब्बल १ हजार ८०० नग बांबू आढळून आल्याची नोंद वनविभागाच्या कागदपत्रांमध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी वनगुन्हा प्रकरण क्र. ०५/२०२६ दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी नोंदविण्यात आले आहे.
रात्रीच्या गस्तीवेळी वाहन आढळले
वनविभागाच्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हरिपुरा राऊंड स्टाफकडून जामुनझिरा ते कोरपावली रस्त्यावर गस्त सुरू होती. यावेळी MH-06-BG-1259 क्रमांकाची बोलेरो पिकअप संशयास्पदरीत्या आढळून आली.
वनकर्मचाऱ्यांनी वाहन थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १ हजार ८०० नग बांबू आढळून आल्याचे वनविभागाच्या नोंदीत नमूद आहे. वाहन जप्त करून पुढील वनगुन्हा तपास सुरू करण्यात आला आहे.
चालक पसार झाल्याने कारवाईबाबत चर्चा
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली असताना संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने वनविभागाच्या कारवाईच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. चालकाला पकडण्यासाठी नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, तसेच वाहनातील बांबूचा स्रोत आणि वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी कशी करण्यात आली, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.
तसेच, या प्रकरणातील गुप्त माहितीचा स्रोत, वाहनाची वाहतूक कोणाच्या सांगण्यावरून केली जात होती आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वनविभागाकडून होणे अपेक्षित आहे. यापूर्वीच्या अशाच कारवायांमध्ये संशयित पसार झाल्याच्या घटनांचीही पडताळणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून बांबू वाहतुकीमागील व्यक्ती तसेच वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.


