भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

न्हावी परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; सट्टा-मटका, जुगार,गावठी दारू अन् गुटख्याची खुलेआम विक्री, पोलीस प्रशासन सुस्त…

न्हावी. ता.यावल. मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील न्हावी परिसरामध्ये सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून गावठी हातभट्टीची दारू, जुगार, सट्टा-मटका आणि प्रतिबंधित गुटख्याची बिनदिक्कतपणे सर्रास विक्री सुरू आहे. या गैरप्रकारांमुळे परिसरातील शांतता धोक्यात आली असून, सर्वसामान्य नागरिक व महिलांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे स्थानिक पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

कारवाईनंतरही गुटखा विक्री जोरात
न्हावी गावामधून यापूर्वीही अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांनी लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता. वारंवार कारवाया होऊनही या ठिकाणी गुटख्याची विक्री थांबण्याचे नाव घेत नाही. छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर साठा करून गावातील पानटपऱ्या आणि दुकानांमधून तरुणाईच्या हाती हा विषारी गुटखा सोपवला जात आहे. कारवाईचा बडगा तात्पुरता ठरत असल्याने विक्रेत्यांचे धाडस अधिकच वाढले आहे.

अर्थपूर्ण दुर्लक्षाची चर्चा
हातभट्टीच्या दारूचे अड्डे आणि जुगार-मटक्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे हे अवैध व्यवसाय कोठे चालतात याची माहिती स्थानिक बीट अंमलदार व पोलीस ठाण्याला असतानाही कोणतीही ठोस मोहीम राबवली जात नाही. संबंधित विभागाच्या याच ‘अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे’ माफियांचे फावले असून पोलिसांचा धाक उरलेला नाही, अशी उघड चर्चा परिसरात रंगली आहे.

या अवैध धंद्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून धडक मोहीम राबवावी आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!