मैत्रिणीने केला घात : १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपींना अटक
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या १६ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीने आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
मैत्रिणीच्या मदतीने कृत्य केल्याचा आरोप
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आपल्या आईसोबत कामाच्या ठिकाणी गेली होती. काम सुरू असताना तिची आई पाणी भरण्यासाठी घरी गेली. याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीची १६ वर्षीय मैत्रीण तेथे आली. तिने एका बहाण्याने पीडित मुलीला महिलांच्या स्वच्छतागृहात नेले.
तेथे राहुल आणि आर्या हे दोघे तरुण आधीपासूनच उपस्थित असल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित मुलगी स्वच्छतागृहात पोहोचल्यानंतर राहुल याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या मैत्रिणीने तिचे तोंड दाबून हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर आर्या यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तक्रार केल्यास धमकी दिल्याचा आरोप
फिर्यादीतील माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी पीडित मुलीवर आलटून-पालटून अत्याचार केला. यानंतर राहुल याने पुन्हा अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आर्या याने दिल्याचा आरोप आहे. तसेच, आपले नाव उघड केल्यास पीडित मुलीला सोडणार नसल्याची धमकी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1), 70(2), 351(2), 49 आणि 3(5) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 10, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी राहुल आणि आर्या या दोघांना अटक केली असून, १६ वर्षीय अल्पवयीन मुलीविरुद्ध कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले करीत आहेत. त्यांना पोलीस निरीक्षक अमित मनेल यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

