भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

सामाजिकसावदा

लेवा समाजाच्या नावाने मंजूर झालेले सभागृह पुढील सभेत लेवा समाजाकडे हस्तांतरित करण्याचा विषय घेण्याची गटनेता रंजना भारंबेंची सभागृहात मागणी

सावदा, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | लेवा समाजाच्या नावाने जागा आरक्षित करून त्याठिकाणी हॉल उभारण्याचा ठराव होऊन हॉल पूर्ण झाल्यानंतर तब्बल १२ वर्षांचा कालावधी उलटला, तरी संबंधित हॉलचे लेवा समाजाकडे अधिकृत हस्तांतरण अद्याप झालेले नाही . ठराव करूनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही? लेवा समाजाच्या मागणीला गेली अनेक वर्षे न्याय मिळाला नाही? यासंदर्भात भाजपा-शिवसेना गटाच्या गटनेता रंजना ताई जितेंद्र भारंबे यांनी हा विषय थेट नगरपरिषदेच्या विशेष सभेत सभागृहात उपस्थित करत पुढील सभेत लेवा समाजाकडे हस्तांतरित करण्याचा विषय घेण्याची मागणी केली आहे.

नगरपरिषदेच्या बाबुशेठ हॉलसमोरील गट नं. ६४९/६५० मधील २० गुंठे जागा लेवा समाजाला देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर दि. २३ नोव्हेंबर २०१२ रोजीच्या सभेत सदर जागा लेवा समाज हॉलसाठी आरक्षित करण्याचा ठराव करण्यात आल्याचे नमूद आहे. त्यांतर पुढे हॉलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तो लेवा समाजाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही अपेक्षित होती.

मात्र, ठराव झाले, जागा आरक्षित झाली, हॉल उभा राहिला; पण हस्तांतरणाची प्रक्रिया मात्र अद्याप कागदावरच का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. ठरावाच्या पूर्ततेसाठी प्रशासनाकडून नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, आणि इतकी वर्षे हा विषय प्रलंबित का ठेवण्यात आला, याचे उत्तर लेवा समाजाला मिळणे आवश्यक असल्याची भूमिका गटनेता तथा नगरसेविका रंजना भारंबे यांनी सोमवार २८ सप्टेंबर रोजीच्या विशेष सभेत नगरपरिषदेच्या सभागृहात मांडली.

“फक्त ठराव करून लेवा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होऊ नये,” अशी स्पष्ट भूमिका गटनेता रंजना भारंबे यांनी मांडली आहे.

पुढील सभेत हस्तांतरणाचा विषय घ्या !

लेवा पाटील समाजाच्या नावाने जागा आरक्षित करून उभारण्यात आलेले प्रभाकर बुला महाजन सभागृह समाजाकडे हस्तांतरित करण्याची मागणी सकल लेवा पाटील समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने लेवा पाटीदार समाजातील सभागृह समाजाकडे अधिकृतपणे हस्तांतरित करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज करण्यात आला आहे. या मागणीची दखल घेत भाजपा-शिवसेना गटाच्या गटनेता रंजना ताई जितेंद्र भारंबे यांनी हा विषय आगामी सर्वसाधारण सभेत घेऊन लेवा समाजाला न्याय देण्याची मागणी सभागृहात केली आहे.

आता नगरपरिषदेने या मागणीवर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या विषयाला आणखी विलंब न करता आगामी सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेऊन सभागृहाचे अधिकृत हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी रंजना भारंबे यांनी केली आहे.

आता निर्णयाची प्रतीक्षा!

लेवा समाजाच्या नावाने करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होणार, याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे. १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर आता केवळ आश्वासन नको, तर सभागृहाच्या हस्तांतरणाचा ठोस निर्णय हवा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आगामी सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन लेवा समाजाला त्यांचे सभागृह अधिकृतपणे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गटनेता रंजना ताई जितेंद्र भारंबे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!