भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

नाशिक-भुसावळ रेल्वेमार्गावर ३० सप्टेंबरला ब्लॉक; ६ मेमू रद्द, जनशताब्दीच्या फेऱ्यांवरही परिणाम

भुसावळ. मंडे टु मंडे न्युज || नाशिक-भुसावळ रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. इगतपुरी-भुसावळ मार्गावरील कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचनेचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्या ठरावीक ठिकाणी काही काळ थांबवून चालविण्यात येणार आहेत.

सहा मेमू गाड्या रद्द
ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर रोजी सहा मेमू गाड्यांचे परिचालन रद्द करण्यात आले आहे. यामध्ये देवळाली-भुसावळ ११११३, भुसावळ-देवळाली ११११४, इगतपुरी-भुसावळ ११११९, भुसावळ-इगतपुरी १११२०, बडनेरा-नाशिक ६११३० आणि नाशिक-बडनेरा ६११२९ या मेमू गाड्यांचा समावेश आहे.

जनशताब्दीचा प्रवास मनमाडपर्यंत
ब्लॉकचा परिणाम जनशताब्दी एक्स्प्रेसवरही होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी हिंगोली डेक्कनहून मुंबईकडे जाणारी १२०७२ हिंगोली डेक्कन-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे मनमाड ते मुंबईदरम्यानची सेवा रद्द राहणार आहे.

त्याचप्रमाणे १२०७१ मुंबई-हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईऐवजी मनमाड येथून नियोजित वेळेनुसार सुटणार आहे. त्यामुळे मुंबई ते मनमाडदरम्यानची सेवा उपलब्ध राहणार नाही.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलणार
यार्ड पुनर्रचनेच्या कामामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार आहेत. धनबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे आणि लोणावळा मार्गे धावतील.

तसेच ३० सप्टेंबर रोजी धावणारी मुंबई-लखनौ एक्स्प्रेस लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन आणि अंकाई मार्गे लखनौकडे रवाना करण्यात येणार आहे.

सात गाड्या ठरावीक वेळेसाठी नियंत्रित
ब्लॉकदरम्यान सात गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. पाटलीपुत्र-एलटीटी, प्रयागराज-एलटीटी, गोरखपूर-एलटीटी, भागलपूर-एलटीटी, एलटीटी-गोरखपूर, मुंबई-आसनसोल आणि एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस या गाड्यांना मार्गावर काही काळ नियंत्रित करण्यात येणार आहे.

यापैकी काही गाड्या भुसावळ-निफाड, तर काही इगतपुरी-नाशिक दरम्यान थांबवून नियंत्रित केल्या जाणार आहेत. संबंधित गाड्यांच्या नियंत्रणाचा कालावधी साधारण एक ते तीन तासांपर्यंत असू शकतो.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचे काम
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक परिसरात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही कामे केली जात आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून यार्ड पुनर्रचना आणि तांत्रिक कामांसाठी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी ३० सप्टेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!