भुसावळ पुन्हा हादरले! क्षुल्लक वादातून तरुणाचा गळा आवळून खून
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || गणेश विसर्जनाच्या दिवशी भुसावळ शहरात तरुणाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर रुमालाने गळा आवळून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत राहुल सदाशिव धांडे (वय ३५, रा. कवठा, ता. अकोट, जि. अकोला) याचा मृत्यू झाला आहे. तर पवन अनिल सोनवणे (वय ३०, रा. वरणगाव) याच्यावर खुनाचा संशय असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि पवन हे दोघे मित्र होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी दोघेही सायंकाळपासून एकत्र होते. रात्रीच्या सुमारास ते जुन्या नगरपालिका विहिरीसमोरील एका खोलीत बसले असताना राहुलने पवनला अश्लील शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येते. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
वाद वाढत जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी संतापलेल्या पवनने राहुलला जमिनीवर आपटले आणि त्यानंतर रुमालाने त्याचा गळा आवळल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. या घटनेत राहुलचा मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर पवन घटनास्थळावरून निघून गेला. त्यानंतर त्याने वरणगाव गाठून मित्र राहुलचा गळा आवळून खून केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरणगाव पोलिसांनी तत्काळ भुसावळ बाजारपेठ पोलिसांना याबाबत कळविले.
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
१५ दिवसांत खुनाची दुसरी घटना
भुसावळ शहरात अवघ्या पंधरा दिवसांच्या अंतरात खुनाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पाटीलमळा परिसरात रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे यांची चॉपरने वार करून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच तरुणाच्या खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


