भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मध्ये ८ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांमधून सुरू असलेल्या फसवणूक, बनावट वस्तूंची विक्री, अवैध शस्त्र बाळगणे आणि वन्यजीव अवयवांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २०० पोलिसांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६१ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहाटे पहाटेची धडक कारवाई
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये पहाटे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी एकाचवेळी छापे टाकले. गेल्या काही वर्षांपासून या भागातील काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दुर्मिळ वस्तू, काळे हळद, मणी, रेड मर्क्युरी, जुनी नाणी, बनावट सोने तसेच इतर कथित मौल्यवान वस्तू दाखवून फसवणूक करत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ राबवत संशयितांवर कारवाई केली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे –

रोख रक्कम – ₹२० लाख
३०० ग्रॅम सोन्याचे दागिने – ₹३० लाख
४ किलो चांदीचे दागिने – ₹८ लाख
दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे
हरणाचे १ कातडे
कोल्ह्याचे १कातडे
सशाचे (Rabbit) १कातडे
४ चारचाकी वाहने
६ दुचाकी वाहने
३० मोबाईल फोन

विविध गुन्हे दाखल
कारवाईदरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम, शस्त्र अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले.

गुन्हेगारीविरोधातील निर्णायक पाऊल
मुक्ताईनगर परिसरात गेल्या काही वर्षांत दरोडा, जबरी चोरी, फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली होती. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून भविष्यातही अशाच प्रकारच्या मोहिमा सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
एकाचवेळी अनेक गावांमध्ये छापे टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने नागरिकांकडून जळगाव पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे. ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ ही मोहीम मुक्ताईनगर तालुक्यातील गुन्हेगारीविरोधातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कारवायांपैकी एक मानली जात आहे. “गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही,” असा ठाम संदेश जळगाव पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!