भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

गुटखा माफियांवर मोक्का, तरीही मुक्ताईनगर गुटख्याचे माहेरघरच! जिल्हा पोलिस अधीक्षकांचे कारवाईचे आश्वासन

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | राज्यभर गुटखा माफियांविरोधात कठोर कारवाया सुरू असताना मुक्ताईनगर तालुक्यात मात्र परिस्थिती उलट असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुटखा माफियांवर मोक्का सारखा कठोर कायदा लागू झाल्यानंतरही तालुक्यात गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आवक होत आहे. रात्रीच्या अंधारात तसेच दिवसा सुरू असलेली ही तस्करी सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेस पडत असताना पोलीस प्रशासन व संबंधित विभागीय यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

राज्यातील विविध भागांत अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि महसूल प्रशासनाकडून सातत्याने धाडसत्र राबवून गुटखा माफियांवर कारवाया होत असताना मुक्ताईनगर तालुक्यात मात्र आजवर झालेल्या कारवाया थातूरमातूर स्वरूपाच्या असल्याचा आरोप होत आहे. परिणामी गुटखा माफियांचे मनोबल वाढले असून त्यांचा अवैध व्यवसाय अधिकच फोफावत आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी दिवसा ढवळ्या गुटख्याची विक्री व वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र कारवाईचा अभाव असल्याने संबंधितांना कोणाचाही धाक उरलेला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या सर्व प्रकारामागे “चिरीमिरी”ची भूमिका असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू असून त्यामुळेच कारवाया होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा माफियांविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. आता तरी गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

या बाबत आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब हे मुक्ताईनगर मध्ये आले असता “मंडे टु मंडे न्युज” चे प्रतिनिधींनी त्यांना या संदर्भात विचारले असता कारवाई करू असे त्यांनी सांगितले.

मोक्का सारख्या कठोर कायद्याची भीतीही गुटखा माफियांना राहिली नाही का? मुक्ताईनगरमध्ये अवैध गुटखा व्यवसायाला नेमके कोणाचे अभय आहे? असे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केले जात आहेत. संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रभावी कारवाई करून या अवैध धंद्याला आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!