भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ मध्ये हवालदाराच्या नावाने लाचेची मागणी ; खासगी इसम ताब्यात

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाने एका खासगी इसमाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिस हवालदार महेश चौधरी यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप संबंधित खासगी इसमावर आहे.

या प्रकरणातील मूळ तक्रारदार व अन्य तीन जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी अटकेची भीती दाखवून पोलिस हवालदार महेश चौधरी यांनी तक्रारदार व अन्य तिघांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये, असे एकूण १ लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यापैकी यापूर्वी ५० हजार रुपये स्वीकारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

उर्वरित ५० हजार रुपयांची मागणी होत असल्याबाबत तक्रारदाराने ३ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीदरम्यान अमन जसबिंदर सनसोये (वय ३६, रा. दीपनगर, भुसावळ) या खासगी इसमाने तक्रारदाराची प्रत्यक्ष भेट घेतली. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपींना अटक न करण्यासाठी पोलिस हवालदार महेश चौधरी यांच्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अमन जसबिंदर सनसोये वय ३६ वर्षे रा दिपनगर भुसावळ (खाजगी इसम) याचे विरोधात गु.र.नं. १८३/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर तसेच पोउपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कर्मचारी प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आणि राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!