भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलराष्ट्रीय

चारधाम यात्रे दरम्यान यमुनोत्रीत किनगावच्या भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू, हरिद्वार येथे आज अंत्यसंस्कार

यमुनोत्री येथे दर्शनानंतर अचानक प्रकृती बिघडली

यावल.मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील भाविकांचा जत्था चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडला गेला असताना दुर्दैवी घटना घडली. यमुनोत्री येथे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना दगडू ओंकार पाटील (वय ६४) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सहकारी भाविकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

दगडू पाटील हे पत्नी विठाबाई पाटील यांच्यासह किनगाव बुद्रुक येथील सुमारे २२ भाविकांसोबत २४ सप्टेंबर रोजी चारधाम यात्रेसाठी रवाना झाले होते. २६ सप्टेंबर रोजी यात्रेकरू हरिद्वार येथे पोहोचले. त्यानंतर विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेत २८ सप्टेंबर रोजी सर्वजण यमुनोत्री येथे गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर पाटील यांना अचानक त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

आज हरिद्वारमध्ये अंत्यसंस्कार
या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर दगडू पाटील यांच्यावर हरिद्वार येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हरिद्वार येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत.

नेदरलँडहून मुलाचा तातडीने प्रवास
दगडू पाटील यांचा मोठा मुलगा किरण पाटील हे नेदरलँड येथे वास्तव्यास आहेत. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने भारताकडे प्रयाण केले. लंडनमार्गे दिल्ली येथे पोहोचल्यानंतर ते पत्नी व दोन मुलांसह हरिद्वारकडे रवाना झाले आहेत. बुधवारी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडणार आहे.

त्यांचा लहान मुलगा चेतन पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेही कुटुंबीयांसह हरिद्वारकडे रवाना झाले आहेत. दगडू ओंकार पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. चारधाम यात्रेदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे किनगाव बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!