महिलेला मोबाईल क्रमांकाची मागणी : तरुणा विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
सावदा,ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हर्षल उर्फ दिगंबर सुनील सपकाळे. (रा. मस्कावद ) याच्याविरुद्ध विनयभंगासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता संबंधित तरुण महिलेच्या घरी आला. त्यावेळी महिला घरात एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्यानंतर त्याने घरात प्रवेश करून तिचा हात पकडत गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर संबंधित तरुण तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर महिलेने पती व नातेवाईकांसह सावदा पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ३३३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.


