20 हजारांची लाच मागणी भोवली; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार निलंबित
भुसावळ,मंडे टु मंडे न्युज || गुन्ह्यात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात खासगी व्यक्तीच्या माध्यमातून 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार महेश एकनाथ चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बुधवारी, 30 सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या कारवाईत गंभीर बाबी निष्पन्न
भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी चौधरी यांनी एका खासगी व्यक्तीच्या माध्यमातून तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाने 3 ऑगस्ट 2026 रोजी मागणी पडताळणी केली होती. त्यामध्ये चौधरी यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या बाबी निष्पन्न झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संशय आल्याने सापळा टळला
एसीबीने 3 ऑगस्ट रोजी सापळा रचला होता. तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन दीपनगर पोलीस चौकीत पोहोचले. मात्र, यावेळी हवालदार महेश चौधरी यांनी तक्रारदाराशी कोणताही संवाद साधला नाही. त्यानंतर संशयित अमन जसबिंदर सनसोये याने तक्रारदाराला फोन करून प्रकरणाबाबत चर्चा केली आणि दीपनगर गेट क्रमांक 500 येथे भेटण्यास बोलावले.
त्यानंतर तक्रारदाराकडून 35 हजार रुपये घेतल्याचे मान्य करत सनसोये याने चौधरी यांच्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले. या प्रकरणी लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अमन सनसोये याला अटक करण्यात आली. त्याला भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणातील पुढील तपास आरोपीच्या चौकशीनंतर अधिक स्पष्ट होणार असून, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तपास करीत आहेत.
निलंबन काळात जळगाव मुख्यालयात हजेरी
निलंबन आदेशानुसार, महेश चौधरी यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथे निश्चित करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
तसेच निलंबनाच्या कालावधीत दररोज सकाळी आणि सायंकाळी राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांच्याकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांना निलंबन काळात निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
निलंबन आदेशात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील तरतुदींचा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले असून, चौधरी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी व त्यानुषंगाने होणाऱ्या कारवाईच्या अधीन राहून निलंबन करण्यात आले आहे. निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

