ब्रेकिंग : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली ५०० ते ६०० कोटींची फसवणूक ; बनावट वर्क ऑर्डर रॅकेटचा पर्दाफाश. जळगाव- धुळे कनेक्शन
महसूल आयुक्तांच्या नावाने बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रांचा वापर
जळगाव,मंडे टु मंडे न्युज | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) तयार करून ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फसवणुकीचा एकूण आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत केला.
या रॅकेटमध्ये महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव आणि त्यांच्या नावाशी संबंधित ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरून हुबेहूब अधिकृत वाटणारी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांच्या आधारे ठेकेदारांना कुंभमेळ्याच्या विविध कामांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्याचा संशय आहे.
अधिकृत वर्क ऑर्डरवर QR कोड, बनावट आदेशांवर मात्र नाही
अधिकृत वर्क ऑर्डरवर QR कोड असतो. मात्र या प्रकरणात तयार करण्यात आलेल्या बनावट वर्क ऑर्डरवर QR कोड नसल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होण्यास मदत झाली.
कुंभमेळ्याच्या कामांसाठी ऑफलाइन निविदाच नाही
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाकडून कोणतीही ऑफलाइन निविदा काढण्यात आलेली नसून, निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. असे असतानाही संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार करून ठेकेदारांना कामांचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा संशय आहे.
जेवण, पाणी, चटया, बादल्या अन् चादरींच्या पुरवठ्याचे आमिष
पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आदी साहित्य पुरविण्याच्या नावाखाली या बनावट वर्क ऑर्डर देण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रत्येक बनावट वर्क ऑर्डरची किंमत सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.
जळगाव-धुळे कनेक्शनचा संशय
या संपूर्ण रॅकेटमध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन व्यक्ती आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयितांची भूमिका आणि त्यांनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा तपास सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश
या गंभीर प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच संबंधितांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली अशा प्रकारच्या बनावट वर्क ऑर्डर किंवा आमिषांना कोणीही बळी पडू नये. कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले आहे.
या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे या रॅकेटमध्ये नेमके किती जण सहभागी आहेत आणि प्रत्यक्षात किती रकमेची फसवणूक झाली आहे, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


