जळगाव

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! नशिराबाद, सबगव्हाण टोलनाक्यांवर आजपासून नवे दर

जळगाव | मंडे टु मंडे न्यूज | जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) नशिराबाद आणि सबगव्हाण टोल प्लाझावर १२ ऑगस्टपासून सुधारित पथकर दर लागू केले आहेत. वाहनांच्या प्रकारानुसार एकेरी प्रवास, परतीचा प्रवास तसेच स्थानिक वाहनांसाठी मासिक पासचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

नशिराबाद टोलवर वाहनानुसार नवे दर
तरसोद-चिखली राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल प्लाझावर कार, जीप, प्रवासी वाहने आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी ११५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १७० रुपये आकारले जातील.

हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवास १८५ रुपये, तर परतीचा प्रवास २८० रुपये असेल. दोन धुरीच्या ट्रक व बससाठी अनुक्रमे ३९० आणि ५८० रुपये टोल राहणार आहे.
तीन धुरीच्या व्यावसायिक वाहनांसाठी ४२५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ६३५ रुपये आकारले जातील. चार ते सहा धुरीच्या जड वाहनांसाठी ६१० रुपये एकेरी आणि ९१० रुपये परतीचा प्रवास असे दर आहेत. सात किंवा त्यापेक्षा अधिक धुरीच्या अवजड वाहनांसाठी एकेरी प्रवास ७४० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १,११० रुपये टोल द्यावा लागणार आहे.

सबगव्हाण टोलवर किती द्यावा लागणार?
तरसोद-फागणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सबगव्हाण टोल प्लाझावर कार, जीप, प्रवासी वाहने आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एकेरी १७० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी २५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवास २७० रुपये, तर परतीचा प्रवास ४०५ रुपये असेल. दोन धुरीच्या ट्रक व बससाठी अनुक्रमे ५६५ आणि ८५० रुपये टोल आकारला जाणार आहे.

तीन धुरीच्या व्यावसायिक वाहनांसाठी ६२० रुपये एकेरी आणि ९३० रुपये परतीचा प्रवास असे दर आहेत. चार ते सहा धुरीच्या जड वाहनांसाठी ८९० रुपये एकेरी आणि १,३३३ रुपये परतीचा प्रवास आकारला जाईल.
सात किंवा त्यापेक्षा अधिक धुरीच्या अवजड वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा दर १,०८५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १,६२५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

स्थानिक वाहनधारकांना मासिक पासची सुविधा
नशिराबाद आणि सबगव्हाण टोल प्लाझाच्या २० किलोमीटर परिसरातील स्थानिक गैरव्यावसायिक वाहनधारकांसाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध आहे. या वाहनधारकांना ३६० रुपयांचा मासिक पास घेता येणार आहे. दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांसाठी हा पास फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवासावेळी स्वतंत्र टोल भरण्याऐवजी मासिक पासचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, हे सुधारित दर जुन्या दरांच्या तुलनेत नेमके किती वाढले किंवा कमी झाले, याची तुलनात्मक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, १२ ऑगस्टपासून नशिराबाद आणि सबगव्हाण या दोन्ही टोल प्लाझावर सुधारित दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!