कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात जामनेरच्या दोघांना अटक; ५९१ कोटींच्या बनावट टेंडरचा पर्दाफाश
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर तयार करून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात जामनेर येथील तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत या फसवणुकीचा पर्दाफाश केला होता. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तब्बल ५९१ कोटी रुपयांचे बनावट टेंडर तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या बनावट टेंडरच्या माध्यमातून तीन कंत्राटदारांना कुंभमेळ्याच्या कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ५ लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या तपासात कंत्राटदारांकडून घेतलेली रक्कम संशयित आरोपींच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.गुन्हे दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासाला वेग देत जळगावमधून तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना ताब्यात घेतले. चौकशीत या प्रकरणाशी संबंधित आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या फसवणूक प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान,नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने बनावट टेंडर काढून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपी तनय महाजन याच्याशी असलेल्या नातेसंबंधावर मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत रोखठोक भूमिका मांडली आहे.


