भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

रेल्वेचा मेगा ब्लॉक; जळगाव–भुसावळ मार्गावरील १४ गाड्या रद्द, काही एक्स्प्रेसचे मार्ग बदलले

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | भुसावळ रेल्वे विभागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. भादली–जळगाव दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत भादली स्थानकाच्या यार्डाची पुनर्रचना आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

या कालावधीत १४ प्रवासी गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दोन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, अनेक महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या १ ते ३ तास विलंबाने धावणार आहेत.

१४ गाड्या पूर्णपणे रद्द
१२ ऑगस्ट रोजी नंदुरबार–भुसावळ, भुसावळ–नंदुरबार, नाशिकरोड–बडनेरा, बडनेरा–नाशिकरोड विशेष, इगतपुरी–भुसावळ, भुसावळ–इगतपुरी, देवळाली–भुसावळ, भुसावळ–देवळाली मेमू, दादर–भुसावळ, भुसावळ–दादर विशेष आणि भुसावळ–कटनी विशेष या गाड्या रद्द राहतील.याशिवाय ११ ऑगस्टची सुरत–भुसावळ, १४ ऑगस्टची भुसावळ–सुरत तसेच कटनी–भुसावळ एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.


दोन एक्स्प्रेसचे मार्ग बदलले
गाडी क्रमांक १७०१९ हिसार–हैदराबाद एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर–नांदेड एक्स्प्रेस या गाड्या नियमित मार्गाऐवजी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाईन)–अकोला–पूर्णा मार्गे धावतील. संबंधित प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खात्री करूनच नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अनेक एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार
१२ ऑगस्ट रोजी बंगळुरू–नवी दिल्ली, एलटीटी–गोरखपूर, यशवंतपूर–हजरत निजामुद्दीन, सीएसएमटी–आसनसोल, एलटीटी–जयनगर, अमृतसर–सीएसएमटी, गोरखपूर–एलटीटी, जयनगर–एलटीटी, गोंदिया–कोल्हापूर, बनारस–हडपसर अमृत भारत आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्स्प्रेस या गाड्यांना विविध स्थानकांवर १ तास ५ मिनिटांपासून ते ३ तासांपर्यंत विलंब होणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक २२५९० हडपसर–बनारस एक्स्प्रेस ही १२ ऑगस्ट रोजी नियोजित सकाळी ७.५० ऐवजी सकाळी १०.२० वाजता हडपसर येथून सुटणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, भादली–जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाचे आणि नॉन-इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार असून गाड्यांचा वक्तशीरपणा, सुरक्षितता आणि संचालन अधिक प्रभावी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!