बनावट शालार्थ आयडी प्रकरणात धक्कादायक खुलासा; नियुक्ती नसतानाही घेतले १०.६१ लाखांचे वेतन
जळगाव | मंडे टु मंडे न्यूज | बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेला राहुल जयप्रकाश पवार (वय ४०, रा. पातोंडा, ता. अमळनेर) याने कोणतीही अधिकृत शिक्षक नियुक्ती नसतानाही तब्बल १० लाख ६१ हजार ७२४ रुपयांचे वेतन घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्री शिवाजी शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राहुल पवार याची शिक्षक म्हणून कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. तरीही मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत त्याच्या बँक खात्यात नियमितपणे वेतन जमा झाल्याचे आढळून आले.
तपास पथकाने शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवला. त्यांच्या माहितीनुसार, राहुल पवार हा २०१२ पासून एप्रिल २०२६ पर्यंत शाळेत कधीही कर्तव्यावर हजर झाला नव्हता. शाळेच्या हजेरी नोंदवहीत, सेवाज्येष्ठता यादीत तसेच इतर अधिकृत नोंदींमध्येही त्याचे नाव आढळून आले नसल्याचे तपासात समोर आले.
संस्थेच्या अध्यक्षांनीही चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती दिली. राहुल पवार याच्या शिक्षकपदाच्या नियुक्तीसाठी संस्थेने कोणताही नियुक्ती आदेश दिलेला नसून, त्यासंदर्भातील कोणताही प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. राहुल पवार याच्या नोंदींमध्ये त्याचा व्यवसाय ‘शेती’ असा नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षक म्हणून नियुक्ती नसतानाही सरकारी यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत त्याने वेतन घेतले का, असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.
२९ एप्रिल रोजी विभागीय शिक्षण कार्यालयात सुनावणीसाठी राहुल पवार येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने २० जानेवारी २०२५ रोजीचा शालार्थ आदेश, १३ डिसेंबर २०१४ रोजीचा वैयक्तिक मान्यता आदेश आणि १९ जानेवारी २०२१ रोजीचा सेवा सातत्य आदेश तपास पथकासमोर सादर केला.
मात्र, संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर या आदेशांच्या नोंदी जावक रजिस्टरमध्येच उपलब्ध नसल्याचे समोर आले. तपासात संबंधित आदेश बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने राहुल पवारची अधिक चौकशी केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन मिळविण्याच्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.


