रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापकांवर निलंबनाची कारवाई
रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणे, विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात बोलावणे तसेच कामकाजात दिरंगाई केल्याच्या तक्रारींची चौकशी केल्यानंतर उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक यांनी ही कारवाई केली. अमोल उत्तमराव पालवे आणि धनराज अशोक लहरिया अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही भूकरमापकांची नावे आहेत.
रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात बोलावले जात असल्याने त्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे तसेच कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचे नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांच्या निदर्शनास आणून दिले.
या तक्रारींची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी संबंधित प्रकरणाची तक्रार उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक यांच्याकडे केली. त्यानंतर विभागीय स्तरावर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती अमोल पालवे आणि धनराज लहरिया यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार दोन्ही भूकरमापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईची माहिती रावेर शहरात पसरताच भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत चर्चा सुरू झाली. काही नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार अमोल जावळे यांचे नागरिकांनी आभार मानले.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाजात नागरिकांची कामे वेळेत आणि नियमानुसार पूर्ण व्हावीत, त्यांना अनावश्यकपणे कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत आणि तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


