भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

आभाळ कोसळलं, शेतकऱ्याचं जगणं विस्कळीत झालं ! थोरगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती..

थोरगव्हाण, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. संतोष राणे सर | थोरगव्हाण शिवारात आज पहाटे चार वाजेपासून ते सकाळच्या सात वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. आभाळ फुटल्यासारखा मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह अखंड सरींनी परिसर झोडपून काढला.

शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करत असतानाच या अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. शेतात उभ्या ज्वारी, हरभरा, गहू, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

थोरगव्हाणसह सुदगाव, रायपूर शिवारातील शेतात अक्षरशः तळे साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मका वाहून गेला असून हरभऱ्याचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. ज्वारीचे पीक हातातून जाण्याची शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

सकाळी चार वाजेपासून सात वाजेपर्यंत अविरत पाऊस कोसळत राहिला. शेतकरी हवालदिल झाले; काहींनी स्वतः शेतात जाऊन पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला, पण मुसळधार पावसाने सगळे प्रयत्न फोल ठरले.

स्थानिक शेतकरी बाळू नारायण पाटील म्हणाले, “आमचं सर्व काही या शेतीवर अवलंबून आहे. एवढ्या जोराच्या पावसामुळे पिकं मातीमोल झाली. सरकारने तातडीने पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा.” अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की, या पावसामुळे शेतात पाणी साचून काही ठिकाणी पिकं कोसळली आहेत. काही शेतांमध्ये अजूनही पाणी ओसरण्याचे चिन्ह नाही.

‘निसर्गाचं पाणी आणि दुःखाचं पाणी’

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता ‘निसर्गाचं पाणी आणि दुःखाचं पाणी’ दोन्ही साचलं आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप, दुसरीकडे भाव न मिळणं, आणि सरकारकडून नुकसान भरपाईसाठीची प्रतीक्षा – या तिहेरी संकटात आजचा शेतकरी अक्षरशः अडकलाय.

“निसर्गाने जे हिरावून घेतलं, ते शासनाने परत द्यावं

शेतकरी वर्गाने मागणी केली आहे की, सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई योग्य प्रमाणात द्यावी. स्थानिक प्रगतिशील शेतकरी बाळू नारायण पाटील यांनी शासनाकडे आवाहन केलं आहे की “निसर्गाने जे हिरावून घेतलं, ते शासनाने परत द्यावं. संकटात शेतकऱ्यांचा हात धरा, कारण शेतकरी जगला तर देश जगेल.” थोरगव्हाण परिसरात सध्या “पाणीही पाणी, आणि डोळ्यातही पाणी” असं दृश्य दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!