भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडाभुसावळ

भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न, युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व नगरपरिषद, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुकास्तरीय शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बियाणी अध्यक्षस्थानी होते. माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा अधिकारी डॉ. नितीन जंगम, मनीष बियाणी, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, प्रा. मनोज वारके, हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.


युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – अभिषेक चावरे
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे म्हणाले, “आजच्या काळात खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नसून त्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहून नियमितपणे मैदानावर खेळले पाहिजे. फुटबॉलसारख्या खेळातून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. ग्रामीण व तालुका स्तरावरूनच अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचतात. त्यामुळे युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहून मेहनत, सातत्य आणि शिस्तीने खेळावे.” शालेय स्तरावरील अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. विजय-पराजयापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणे आणि त्यातून अनुभव मिळवणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


विविध वयोगटांत चुरशीच्या लढती
स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. १९ वर्षे मुलांच्या व मुलींच्या वयोगटात नाहाटा कॉलेजने प्रथम क्रमांक, तर अलहिरा उर्दू स्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षे मुलांच्या वयोगटात सेंट अलॉयसेस स्कूल, भुसावळने प्रथम, तर ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळने द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलींच्या गटात ताप्ती पब्लिक स्कूलने प्रथम, तर डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला.
१४ वर्षे मुलांच्या वयोगटात सेंट अलॉयसेस स्कूलने प्रथम, तर ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ प्रथम, तर बियाणी मिलिटरी स्कूल द्वितीय ठरले.


स्पर्धेदरम्यान विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मैदानावर चुरशीच्या लढती दिल्या. संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळाडूंनी कौशल्य, वेग, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडविले. त्यामुळे मैदानावर खेळाडूंसह प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.


पंचांनी बजावली महत्त्वाची भूमिका
स्पर्धेतील पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरहान शेख, सिद्धेश नरवाडे, मुजमिल शेख, माविया कुरैशी, चेतन बडगे, ॲलिस्टर सिमन्स, सुमित दासगुप्ता, अर्जुन सणस, तोसिफ कुरैशी, याकूब शेख आदींनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय स्तरावर फुटबॉलसारख्या खेळांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता भविष्यात भुसावळ तालुक्यातून अनेक गुणवंत खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!